१४ डिसेंबर
ग. दि. माडगूळकर स्मृतिदिन
कविता आणि कथा सारख्याच सहजपणे लिहिणाऱ्या सिद्धहस्त साहित्यिक गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील शेटफळ येथे १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. संतकवी व शाहीर यांच्या वाड्मयाचे संस्कार घेऊनच माडगूळकर यांची कविता जन्माला आली, अत्यंत सुगम, चित्रदर्शी , गेय आणि प्रास्तविक रचना है त्यांच्या काव्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. 'गीत रामायण' हे अमर काव्य लिहून त्यांनी आपले नाव मराठी साहित्यामध्ये चिरस्थायी केले.
त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल व औंध या गावी झाले. मंट्रिक नंतर ते चित्रपट व्यवसायासाठी कोल्हापूरला गेले. मा. विनायक यांच्या 'ब्रह्मचारी' या गाजलेल्या चित्रपटापासून या व्यवसायाची सुरुवात त्यांनी केली. एक दामाजी व पहिला पाळणा या चित्रपटांसाठी त्यांनी प्रथम चित्रपट गीतरचना लिहिल्या.
इ.स. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी भाग घेतला होता. चलेजाव चळवळीच्या काळात सातारा जिल्ह्यात स्थापन झालेल्या प्रतिसरकारच्या कार्यात त्यांनी भाग घेतला होता. भूमिगत कार्यकत्यांना आश्रय देणे, त्यांना सर्व प्रकारची मदत करणे, लोकजागृती घडवून आणणे, देशभक्तीपर गाणी लिहिणे इत्यादी कामे त्यांनी केली. प्रतिसरकारने कार्यकर्ते व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते.
सोळा सतराव्या वर्षांपासूनच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. चैत्रबन, जोगिया, सुगंधी वीणा हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह होत.
माउलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्हाासम तोंड पसरी शिवार
अशी रसाळ, सहजसुंदर भाषा व भावोत्कटता असे त्यांच्या काव्याचे विशेष आहेत. गीतरामायणामुळे 'आधुनिक वाल्मीकी' असा गौरव त्यांचा केला जातो. काव्यलेखनाबरोबर कादंबरीकार व कथालेखक म्हणूनही ते लोकप्रिय ठरले. त्यांनी काही व्यक्तिचित्रे लिहिली व ललितलेखनही केले. ग. दि. माडगूळकरांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांच्या कथा, संवाद व गाणी लिहिली. 'पुढचं पाऊल', 'बाळा जो जो रे', 'लाखाची गोष्ट', 'ऊन-पाऊस', 'सांगते ऐका', विद्यणावचे शहाणे', 'संथ वाहते कृष्णामाई', 'जगाच्या पाठीवर', 'गूंज उठी शहनाई' इत्यादी त्यांचे चित्रपट रसिकांनी उचलून धरले.
चैत्रबन, जोगिया, मंतरलेले दिवस या त्यांच्या साहित्यकृतीस महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. १९७३ मध्ये झालेल्या ४९ व्या अ.भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. भारतसरकारने पद्मश्री किताब देऊन त्यांचा गौरव केला. गीतगोपाल, गीत सौभद्र, चंदनी उदबत्ती, कृष्णाची करंगळी, आकाशची फळे, वाटेवरल्या सावल्या, बांधावरच्या बाभळी, तीळ तांदूळ अशा विविध रंगाढंगांनी त्यांची ग्रंथसंपदा नटलेली आहे. त्यातून जीवनातील उदात्ततेचे भव्योत्कट दर्शन त्यांनी आपल्या साहित्यातून घडवले, असे महान प्रतिभेचे कवी ग. दि. माडगूळकर १४ डिसेंबर, १९७७ रोजी काळाच्या पडद्याआड गेले.
Comments
Post a Comment