साने गुरुजी जन्मदिन
"समाजात वावरताना वादळे येणार, विजा कडकडणार, निंदा धुळवडीसारखी होणार, पण मनाचा तोल न सोडता, आकाशासारखे उंचच उंच मन राखावे आणि आपले कर्तव्य करीत राहावे." अशी शिकवण देणाऱ्या साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर, १८९९ रोजी कोकणातील पालगड या गावी, सदाशिवराव खोतांच्या घरी झाला.
अत्यंत खडतर परिस्थितीत कधी चुरमुरे खाऊन तर कधी एक वेळचे जेवून ते एम.ए. झाले. १९३० सालापासून महात्माजींच्या 'चलेजाव' चळवळीने प्रेरित होऊन, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपला शिक्षकी पेशा सोडून राजकीय चळवळीत भाग घेतला. अनेकदा तुरुंगवास, कष्ट, हाल सोसले.
लेखक, कवी, शिक्षक, पत्रकार, वक्ते असे विविधरंगी व्यक्तिमत्त्व असलेल्या साने गुरुजींना 'मुले म्हणजे देव, मुले म्हणजे राष्ट्राची ठेव' असे वाटे. आपले सर्व लेखन समाजोद्धारासाठी समर्पित केले. समाजाच्या हृदयाला जाऊन भिडणारी 'श्यामची आई' सारखी कादंबरी व लहान मुलांसाठी अनेक गोष्टींची पुस्तके त्यांनी लिहिली. निर्मळ, निष्पाप मुलांमध्ये ते मूल होऊन रंगले. 'करी मनोरंजन जो मुलाचे। जडेल नाते प्रभुशी तयाचे।' अस ते म्हणत. राष्ट्रपुरुषांच्या, देशभक्तीच्या, विश्वबंधुत्वाच्या, एकतेच्या, समतेच्या अशा अनेकविध कविताही लिहून समाजाला निःस्वार्थीपणाचा, सद्गुणांचा, मांगल्याचा, जनसेवेचा देशभक्तीचा त्यांनी संदेश दिला.
मानवी जीवनाला लागलेला 'अस्पृश्यते'चा कलंक पुसून काढण्याचे व्रत साने गुरुजींनी घेतले होते. त्यासाठी पंढरपूरचे विठ्ठलाचे देऊळ त्यांनी हरिजनांना दर्शनासाठी मोकळे करविले. 'साधना' साप्ताहिक काढून त्यांनी स्वतंत्र भारताच्या उभारणीसाठी नवतरुणांना जागृत ठेवणारे अप्रतिम लेख लिहिले. शिवाय 'साधना'तून लिहिलेली 'सुंदर पत्रे' ही केवळ पुतणी सुधा हिलाच न लिहिता महाराष्ट्रातील सर्व मुलांना निसर्गाचे, जीवनातील विविध अंगांचे दर्शन त्यांनी घडविण्यासाठी लिहिली आहेत.
समृद्धी व समतेवर आधारलेला, घाम गाळणारा, धर्म-जातींचे भेद विसरून एकजूट साधणारा 'बलसागर' भारत त्यांना अपेक्षित होता. सरकारने हे करावं ते करावं असे म्हणण्यापेक्षा 'मी माझा देश घडवतो आहे' असे परिश्रमपूर्वक म्हणणारे लोक, लोकनेते त्यांना हवे होते. त्यासाठी श्री शिवराय, लो. टिळक, म. गांधी, पंडित नेहरू इत्यादींच्या चरित्रांवरून अपूर्व त्यागाची देशभक्ती त्यांनी जनतेसमोर मांडली. अज्ञान, निरक्षरता व व्यसनाधीनतेच्या भोवऱ्यात अडकलेल्या आपल्या ग्रामीण बांधवांसाठी सानेगुरुजींनी 'साक्षरतेच्या कथा', 'दारूबंदीच्या कथा', 'भारतीय संस्कृती', 'आपण सारे भाऊ' यांरसारखे वाङ्मय लिहिले.
१९४६ सालच्या कुमारांच्या चौथ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून नव्या पिढीला उद्बोधक व प्रेरक ठरणारे भाषण त्यांनी केले! प्रेम हाच 'खरा तो एकचि धर्म' मानणाऱ्या सानेगुरुजींनी 'स्त्री जीवन' व 'स्त्री गीत' कृतज्ञतापूर्वक रेखाटली. अशा या थोर साहित्यिक, देशसेवकाने ११ जून १९५० रोजी आपण होऊन जगाचा निरोप घेतला, 'खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे ।।' किंवा 'बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनि राहो।' असा राष्ट्रप्रेमी आणि मानवधर्माचा संदेश देणारे भावनोत्कट व संवेदनशील व्यक्तिमत्त्व कायमचे लयास गेले. विनोबांचा "अमृत-पुत्र' भारताच्या एकात्मतेची स्वप्ने पाहात परलोकी निघून गेला.
very nice post
ReplyDelete